Sunday, December 21, 2014

एमपीएससी (पेपर १) भूगोल

दिवाळीनंतर लगेचच राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१५चे परिपत्रक जाहीर होईल. त्यामुळे २०१५ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीला लवकरात लवकर सुरुवात केलेली उत्तम. आज आपण हवामानशास्त्र या उपघटकाअंतर्गत येणाऱ्या ग्रहीय व स्थानिक वाऱ्यासंदर्भात माहिती घेणार आहोत. पूर्वपरीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी हा उपघटक अत्यंत महत्त्वाचा आहे.
ग्रहीय व स्थानिक वारे
पृथ्वीवर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना 'ग्रहीय वारे' असे म्
हणतात. या वाऱ्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते- व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे.
व्यापारी वारे / पूर्वीय वारे
उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्तांदरम्यान कर्क व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाचे पट्टे आहेत. येथून विषुववृत्ताजवळील ० ते ५ अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.
व्यापारी वारे १० अंश ते २५ अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहत असतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून यांना 'पूर्वीय वारे' असे म्हणतात.
व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार -
० उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे - उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहत असल्याने यांना 'ईशान्य व्यापारी वारे' असे म्हणतात.
० दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे - दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याने यांना 'आग्नेय व्यापारी वारे' असे म्हणतात.
    व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टय़े -
* हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. सागरी प्रदेशातून हे वारे नियमितपणे व वेगाने वाहतात.
* खंडांतर्गत प्रदेशात हे वारे त्या मानाने संथगतीने वाहतात.
* व्यापारी वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे १६ ते २४ कि.मी. असतो.
* व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहतात, म्हणून हे उष्ण असतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण करण्याची शक्ती वाढल्याने पूर्वेकडे हे वारे अधिक पाऊस देतात. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात, तसा त्यामुळे पाऊस पडत नाही. म्हणूनच खंडाच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश आढळतो.
प्रतिव्यापारी वारे/ पश्चिमी वारे
उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आहे. येथून ध्रुव वृत्ताजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिणेदरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना 'प्रतिव्यापारी वारे' असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून यांना 'पश्चिमी वारे' असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांचे खालील दोन उपप्रकार आहेत.
* उत्तर गोलार्धातील नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे - उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असल्याने त्यांना नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात.
* दक्षिण गोलार्धात वायव्य प्रतिव्यापारी वारे - दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे वाहत असल्याने यांना 'वायव्य प्रतिव्यापारी वारे' असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांची वैशिष्टय़े
* प्रतिव्यापारी वाऱ्यांची दिशा व गती अनिश्चित असते. काही वेळेला हे वारे संथपणे वाहतात, तर काही वेळेस त्यांना उग्र वादळी स्वरूप प्राप्त होते.
* प्रतिव्यापारी वारे कर्क व मकर वृत्तातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुव वृत्तावरील कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात.
* प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असतात, त्यामुळे या वाऱ्यांची बाष्पधारण शक्ती कमी होते.
* उत्तर गोलार्धात प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या दिशेवर आवर्त-प्रत्यावर्ताचा परिणाम होतो. हिवाळ्यात प्रतिव्यापारी वारे वेगाने वाहतात.
* दक्षिण गोलार्धात सागरी प्रदेश जास्त असल्याने प्रतिव्यापारी वारे नियमितपणे वाहतात. दक्षिण गोलार्धामध्ये ४० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा अडथळा नसल्याने हे वारे वेगाने वाहतात. वाहताना ते विशिष्ट आवाज करत वाहतात, म्हणून त्यांना 'गरजणारे चाळीस वारे' असे म्हणतात.
* ५० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने या वाऱ्यांना कसलाच अडथळा नसतो. या भागात वाऱ्याचा वेग जास्त असतो आणि ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना 'खवळलेले पन्नास वारे' किंवा 'शूर पश्चिमी वारे' असे म्हणतात.
ध्रुवीय वारे
ध्रुवाजवळील हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवाजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना 'ध्रुवीय वारे' असे म्हणतात.
ध्रुवीय वारे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून त्यांना 'पूर्व ध्रुवीय वारे' असे म्हणतात.
उत्तर गोलार्धात या वाऱ्यांना 'नॉरईस्टर' असे म्हणतात. ते अतिशय वेगाने वाहतात.
* विषुववृत्तीय शांत पट्टा - विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे पाच अंशांपर्यंत वर्षांतील बराच काळ हवा शांत असल्याने वारे वाहत नाहीत. म्हणून या पट्टय़ाला 'विषुववृत्तीय शांत पट्टा' असे म्हणतात.
* आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा - विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्रित येतात त्यांना आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा असे म्हणतात.
* अश्व अक्षांश - कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या २५ अंश ते ३० अंश उत्तर व दक्षिणदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो, या पट्टय़ाला अश्व अक्षांश असे म्हणतात. हा पट्टा शांत पट्टा आहे.
भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे
* विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा - ५ अंश उत्तर आणि ५ अंश दक्षिण यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. या पट्टय़ाला विषुववृत्तीय शांतपट्टा असे म्हणतात. विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते.
* कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे -  २५ अंश ते ३५ अंश उत्तर ते दक्षिण विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ातून ऊध्र्वगामी बनलेली हवा वर जाते व तेथे थंड होऊन ती कर्कवृत्त व मकरवृत्तावर अधोगामी दिशेने येते, त्यामुळे २५ अंश ते ३५ अंश उत्तर व दक्षिण पट्टय़ात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. या पट्टय़ाला उपउष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा असेही म्हणतात.
* उपध्रुवीय/ समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा - दोन्ही गोलार्धात ६० ते ७० अक्षवृत्ताचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून या प्रदेशात हवेचा दाब हा कमी असतो. पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे या पट्टय़ातील हवा बाहेर फेकली जाते, त्यामुळे हवा विरळ होऊन येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
* ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा- ध्रुवावर तापमान कमी असते व त्यामुळे तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
* कोरिऑलिस फोर्स - पृथ्वी फिरताना तिच्याभोवती वातावरणदेखील फिरत असते. पृथ्वीच्या या गतीमुळे निर्माण होणाऱ्या या शक्तीला कोरिऑलिस फोर्स असे म्हणतात. यामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेवर परिणाम होतो. यासंबंधी महत्त्वाचे संशोधन फेरल या शास्त्रज्ञाने केले. त्यानुसार कोरिऑलिस फोर्समुळे वारे हे उत्तर गोलार्धात वाहताना आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे म्हणजे घडय़ाळ्याच्या काटय़ाच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात, म्हणजेच आपल्या मूळ दिशेकडून डावीकडे वाहतात.  

No comments:

Post a Comment