Tuesday, January 13, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा : महर्षी कर्वे (Maharshi Karve)

(१८ एप्रिल १८५८ - नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरूड रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.


१८९१ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे सुमारे २३ वर्षे त्यांनी फर्ग्युसनमध्ये अध्यापनाचे कार्य केले. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ स्थापन केली. या संस्थेच्या फंडाच्या व्याजाचा उपयोग पुनर्विवाहेच्छू विधवांच्या मदतीसाठी केला जात असे. १ जानेवारी, १८९९ रोजी त्यांनी पुण्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेच्या कार्याची सुरुवात केली. (याच संस्थेला पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले. आज ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित आहे.)  १९०० साली महर्षी कर्वे यांनी आश्रमासाठी पुण्याजवळ हिंगणे येथे एक झोपडीवजा घर बांधले. येथेच त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली. १९०७ साली त्यांनी ‘महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात बालसंगोपन, आरोग्य, गृहजीवन शास्त्र आदी विषयांचे प्रशिक्षण महिलांना दिले जात होते. बदलत्या काळानुसार व गरजांनुसार कर्वे यांनी पुढे शिक्षणपद्धतीत व अभ्यासक्रमात अनेक सुधारणा केल्या. म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. नेहरू अशा अनेक मान्यवर नेत्यांनी प्रत्यक्ष हिंगणे येथे भेट देऊन महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.

१९१४ साली फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सारा वेळ आश्रम आणि महिला विद्यालयाकडे देता येऊ लागला. १९१६ साली त्यांनी जपानच्या धर्तीवर महिला विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ मानले जाते.या विद्यपीठाच्या महाविद्यालयाचे कर्वे हे पहिले प्राचार्य झाले. पुढील वर्षी शिक्षकांना प्रशिक्षण देणार्‍या विद्यालयाची त्यात भर पडली. [या विद्यापीठाचे पुढे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ] (एस.एन.डी.टी. विद्यापीठ) - असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम मराठी होते. परंतु इंग्रजी या ज्ञानभाषेचे शिक्षण, नर्स (परिचारिका) प्रशिक्षण आदी विशेष अभ्यासक्रमही विद्यापीठात शिकवले जात असत.

खेड्यातील महिलांना शिक्षित  करण्याच्या कार्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे असे ठरवून त्यांनी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ नावाची संस्था उभी केली. समाजामध्ये समता यावी, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी तीनशे समविचारी सहकार्‍यांना बरोबर घेऊन १९४४ साली ‘समता संघ’ स्थापन केला. स्थापन केलेल्या संस्थांना त्यागी वृत्तीने सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते मिळण्यासाठी त्यांनी कार्यकर्ते घडवणार्‍या ‘निष्काम कर्ममठ’ या संस्थेची स्थापना सुरुवातीलाच केली होती . 

अल्बर्ट आइनस्टाइन, मादाम मॉंटेसरी, रवींद्रनाथ टागोर या विद्वानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९४२ साली बनारस हिंदू युनिर्व्हसिटीने त्यांना मानद पदवी देऊन त्यांचा सत्कार केला. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले. १९५८ साली, वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महर्षी कर्वे यांना महाराष्ट्र ‘अण्णा’ या नावानेही ओळखतो. प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी जगलेले अण्णा सुमारे १०५ वर्षांचे कृतकृत्य जीवन जगले.     
पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनया संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. महर्षी अण्णासाहेब कर्वे   महर्षी अण्णासाहेब कर्वे आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले; पण तरीही डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळकाढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली अनाथ बालिकाश्रमया संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही (१९२९-३२) मिशनरी बाण्याने वणवण केली.


महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज मुरुड फंड’ (१८८६), स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला निष्काम मठ’ (१९१०), ग्रामीण शिक्षणासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ (१९३६), जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला समता-संघ’ (१९४४) इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.

आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्या आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण (१९५५), भारतरत्न (१९५८) या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे.

संदर्भ : १. नित्सुरे, य. गो. भाग्यवान शतायुषी, पुणे, १९५८.
     २. शिखरे, दा. न. महर्षि अण्णासाहेब कर्वे, पुणे, १९५८. 

माडगूळकर, अं. दि.


1 comment:

  1. ✅ *१८८३ मध्ये महर्षी करव्यांनी एका विधवेशी विवाह केला तेव्हा त्यांच्या विवाहाच्या निमंत्रणावर कोणाची सही होती ?

    ReplyDelete