Tuesday, January 6, 2015

आझाद हिंद सेना : (Azad Hind Army)

झाद हिंद सेना जरी युद्धासाठी सज्‍ज झाली, तरी जपानी अधिकारी तिला आपल्या बरोबरीची समजण्यास तयार नव्हते. त्यांचे मत असे होते की, तिच्यातील बहुतेक सैनिक ब्रिटिशांच्या नोकरीतील भाडोत्री सैनिक असल्याने ते जपान्यांप्रमाणे जिद्दीने लढणे शक्य नाही. म्हणून त्यांची स्वतंत्रच पथके ठेवावीत. परंतु हे मत नेताजींना अमान्य होते. त्यांना आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी आपले सैन्य जपान्यांबरोबर मुद्दाम धाडले. आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहून जपान्यांचेही पुढे मत बदलले. १९४४ च्या मार्च महिन्यात जपान्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य सीमेवर चढविलेल्या हल्ल्यात भाग घेण्यासाठी ह्या सेनेतील काही पथके धाडण्यात आली. सीमेवरील इंफाळ येथे झालेल्या लढाईत ह्या सैन्यातील काही पथकांनी चांगली कामगिरी बजाविली. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले. ह्या वेळी कॅप्टन सूरजमल ह्यांच्या हाताखाली एक जपानी पलटणही देण्यात आली होती. मोडोकप्रमाणे इतर लढायांतही ह्या सेनेने चांगले पराक्रम केले. एक मोक्याचे ठिकाण जिंकण्याची आज्ञा होताच, लेफ्टनंट मनसुखलाल व मूठभर सैनिकांनी जिवाची पर्वा न करता ती टेकडी जिंकली व आपण जपानी सैनिकांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे सिद्ध केले. ह्या युद्धात मनसुखलाल ह्यांना अनेक जबर जखमा झाल्या, तरी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केलेच. आझाद हिंद सेनेच्या इतर पथकांनीही अशीच उत्तम कामगिरी बजावली. परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री, तसेच जपानी सैनिकांनी घेतलेली युद्धक्षेत्रातील माघार ह्यांमुळे सुभाष पथकास नाइलाजाने माघार घ्यावी लागली. शिवाय अपुरा शस्त्र-व अन्न-पुरवठा, रसद मिळण्यातील अडचणी, जपान्यांचे लहरी सहकार्य इत्यादींमुळेही लढाई थांबविणे ह्याशिवाय त्यास दुसरा पर्याय नव्हता. ही पीछेहाट चालू असतानाच ब्रिटिशांनी विमानांतून पत्रके टाकली व ब्रिटिश सैन्यात परत या, अशी लालूच दाखविली. पण एकाही सैनिकाने त्यास भीक घातली नाही किंवा आझाद हिंद सेनेशी बेइमानी केली नाही, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट होय. भारत-सीमा पार करून पुढे ब्रह्मदेशात आगेकूच करणाऱ्या ब्रिटिश व भारतीय सैन्याला आझाद हिंद सेनेची पथके शरण आली. २ मे १९४५ रोजी रंगून पडल्यावर थोड्याच दिवसांत पुढे जपानने शरणागती पतकरली. नेताजी त्या वेळी सिंगापूरहून विमानाने टोकिओला जात असता अपघात होऊन मृत्यू पावले असावेत, असे म्हणतात. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला. शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले. तथापि भारतीयांच्या यासंबंधीच्या प्रक्षुब्ध लोकमताच्या जाणिवेने ब्रिटीश सरकारने या आधिकाऱ्यांच्या शिक्षा माफ केल्या (३ जानेवारी १९४६).

झाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने, मानाने व आदराने ‘नेताजी ְ म्हणू लागली; त्यांनी दिलेली ‘जय हिंदही घोषणा आजही सर्वतोमुखी झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात जरी ही सेना पराजित झाली असली, तरी तिचे उद्दिष्ट, तीमागील प्रेरणा आणि जिद्द व थोड्या अवधीत तिने केलेली कामगिरी, यांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सेनेच्या अल्पकालीन पण स्फूर्तिदायक इतिहासास काही आगळे व महत्त्वाचे स्थान आहे.  (चित्रपत्र) 

पहा : बोस, सुभाषचंद्र; भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास. 

संदर्भ : 1.Majumdar,R.C. History of freedom Movement in India-Vol. III,Calcutta, 1963.             
            2.Majumdar, R.C. Ed. Struggle for freedom-Vol.xI, Bombay,1969. 

source: marathi vishvkosh


देवगिरीकर,त्र्यं. र.; पाटणकर, गो. वि; नरवणे, द. ना.

गांधी-आयर्विन करार ( Gandhi-Irwin Pact)

गांधी-आयर्विन करार हा महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात मार्च ५, इ.स. १९३१ ला झालेला एक करार होता.[१]

करारातील प्रमुख कलमे

  • राजकीय कैद्यांची सुटका व्हावी. त्यांच्यावरील दावे काढून टाकावेत. वटहुकूम परत घ्यावेत.
  • मिठावरील कर काही प्रमाणात रद्द व्हावा. गरिबांना मीठ तयार करण्यास परवानगी मिळावी.
  • परदेशी दारू व माल विकणार्या दुकांनांवर शांततामय निदर्शने करण्याचा हक्क असावा.
  • कायदेभंग चळवळीत सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली आहे, ती त्यांना परत करावी.
  • कायदेभंग चळवळ स्थगित व्हावी.
  • राष्ट्रसभेने गोलमेज परिषदेत सहभाग घ्यावा.
  • बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.

परिणाम

पंडित जवाहरलाल नेहरूसुभाषचंद्र बोस यांना करारातील कलमे आवडली नाहीत. त्यांच्या मते गांधीजींनी सरकारला फार सवलती दिल्या.[२]

संदर्भ आणि नोंदी

  1. डॉ. जी.आर. पाटील (१८ मार्च, इ.स. २०१३). स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी : पेपर- १ आधुनिक भारताचा इतिहास. लोकसत्ता. २२ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  2. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. १३ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. “द स्ट्रगल फॉर फ्रिडम” (इंग्रजी मजकूर)
  3. source: wikipedia

महाराष्ट्र राज्य माहिती - (Maharashtra State Information)

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
विषयमाहिती
स्थापनदिन१ मे १९६०
राजधानीमुंबई
उपराजधानीनागपूर
अक्षांश१५*.८’ उत्तर २२*.१’ उत्तर
रेखांश७२* .६’ पूर्व ते ८०*.९’ पूर्व
चतुःसीमापूर्व - छत्तीसगड, पश्चिम - अरबी समुद्र, दक्षिण - गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश, उत्तर - दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.
क्षेत्रफळ३,०७, ७१३ चौ. किमी.
एकूण वनक्षेत्र६४०७८ चौ. किमी.
वन्यजीव सुरक्षित क्षेत्र१५,३२,१५ चौ किमी
पूर्व-पश्चिम लांबी८०० किमी
दक्षिणोत्तर लांबी८०० किमी.
समुद्र किनारा७२० किमी
हवामानउन्हाळा ३९* ते४२*, हिवाळा ३४* ते १२*, पावसाळा जून ते सप्टेंबर
पर्वत रांगासातपुडा,सह्याद्री – (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर.)
सर्वात उंच शिखरकळसूबाई - १,६३६ मीटर
महत्त्वाचे घाटकोकणात जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट : थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा, फोंडा व आंबोली घाट, पुणे - सातारा : कात्रज, खंबाटकी, पुणे – सासवड : दिवा घाट, औरंगाबाद - चाळीसगाव : औट्रम घाट
प्रमुख नद्यानर्मदा,तापी : (उपनद्या- पांझरा,गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण), वैणगंगा: ( पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा.), गोदावरी:( कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती), भीमा: (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना.), कृष्णा: (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा.), कोकणातील नद्या: वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्रई, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.
महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमांक लागतो.

Monday, January 5, 2015

ब्राह्मणेतर चळवळ :

ब्राह्मणवर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध ब्राह्मणेतरांनी केलेली चळवळ. ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली. शिक्षणामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेले जोतीरावर गोविंदराव फुले हे ब्राह्मणवर्चस्वाच्या विरोधी बंड करणारे पहिले नेते होत. त्यांच्या आधी लोकहितवादींनी ब्राह्मणांवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली होती. जोतीराव बहुजनसमाजातून पुढे आलेले होते. मानवाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर त्यांची श्रद्धा होती. या श्रद्धेतूनच त्यांनी आपली सत्यशोधक चळवळ सुरू केली. १८७३ साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाला सुरुवातीला चांगले अनुयायी मिळाले. विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मारुतराव नवले, रामचंद्र हरी शिंदे, रामशेट उधवणे, संतूजी लाड या सत्यशोधकांनी चळवळीचे क्षेत्र व्यापक बनविण्याचा प्रयत्न केला. भालेकर यांचे दीनबंधु साप्ताहिक चळवळीचे मुखपत्र होते. जोतीराव फुले (१८२७ - ९०) यांचे गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब; नारायण मेघाजी लोखंडे यांची सत्यशोधकी निबंधमाला; मुकुंदराव पाटील यांचे कुलकर्णी लीलामृत ही पुस्तके ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासात बरीच गाजली. ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नांचा विचार केलेला असला, तरी ही चळवळ प्रामुख्याने भिक्षुकीशाहीविरुद्धचे बंड होती. परमेश्वराकडे जाताना मध्यस्थाची आवश्यकता नाही, म्हणून जोतीरावांनी पुरोहितांचे महत्त्व नाकारले. धार्मिक विधीदेखील पुरोहितांच्या मार्फत करू नका, असे फुल्यांनी आवाहन केले होते. बहुजनसमाजाला समजावे या हेतूने सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजाविधी (१८८७) ही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. शूद्रातिशूद्रांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. ब्राह्मणेतरांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, ही त्यांची आंतरिक इच्छा होती.

जोतीरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचा प्रभाव कमी झाला. देशाचे वातावरण हळूहळू बदलत होते. तुरळक प्रमाणात कोठे सत्यशोधकी जलसे होत असले, तरी एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेले पुरोहितशाहीविरुद्धचे वातावरण बरेचसे निवळत गेले.

हात्मा फुले यांच्या कार्याने प्रभावित होऊन कोल्हापूरच्या छ. शाहू महाराजांनी धार्मिक आणि सामाजिक अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याचा प्रसार करण्याचे धोरण अवलंबले. १९०० मध्ये वेदोक्त प्रकरण निर्माण झाले. राजोपाध्ये  यांनी छत्रपतींच्या घराण्याला वेदोक्ताचा अधिकार नाकारला. महाराजांना शूद्र ठरवले. साहजिकच यातून कटू प्रसंग निर्माण झाले. ज्या शिवछत्रपतींमुळे हिंदू धर्म तरला त्यांच्याच वंशजास शूद्र ठरवल्यामुळे ब्राह्मणेत्तर समाजात असंतोष निर्माण झाला. महाराजांनीही वेदोक्ताचा हक्क नाकारणाऱ्यांची संस्थानावरील इनामे जप्त केली. लोकमान्य टिळकांसारख्या मान्यवर नेत्याने या प्रकरणातील तीव्रता कमी केली.

हाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची सूत्रे अप्रत्यक्ष रीत्या शाहू महाराजांच्या हाती गेली. त्यांनी या चळवळीला विधायक स्वरूप दिले. केवळ ब्राह्मणविरोध हा दृष्टिकोन न ठेवता त्यांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सुधारणा घडवून आणल्या. अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम उघडली. परिषदा आणि भाषणे यांद्वारे चळवळीचे लोण संस्थानाबाहेर नेले. मद्रासच्या जस्टिस पार्टीच्या नेत्यांबरोबर संबंध प्रस्थापित केले. याच काळात भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे यांसारख्या विचारवंतांनी मोलाची भर घातली. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१९२२) चळवळीला दिशा उरली नाही. मात्र या काळातही माधवराव बागलांसारखे एखादे व्यक्तिमत्व फुल्यांचा जुना वारसा सांभाळीत होते. कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे.

राष्ट्रीय चळवळीत लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधींचा उदय झाला. त्यांच्या सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या धोरणाचा आदर साहजिकच महाराष्ट्रातील बहुजनसमाजाने केला. ब्राह्मणतेर चळवळीचे त्यावेळचे नेते केशवराव जेधे, शंकरराव मोरे हे १९३० नंतर राजकीय चळवळीत पडले. त्यामुळे ब्राह्मणतेर चळवळीचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी झाला.

मिळनाडूतील सामाजिक स्थिती महाराष्ट्रापेक्षा खूपच निराळी होती. स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना सर्वच जातिजमातींत दिसून येतात. श्रेणीरचनेतील स्थानानुसार इतर जातींच्या लोकांनी अंतर ठेवून व्यवहार करावे, असे नियम होते. महाराष्ट्रात मराठा समाजासारखा आर्थिक, सामाजिक दृष्टीने बराचसा तुल्यबळ असलेला समाज ब्राह्मणविरोधी संघर्ष करण्यासाठी अस्तित्वात होता. केरळमध्ये ब्राह्मणांना तुल्यबळ नायर समाज होता. तमिळनाडूत ब्राह्मणेतरांमध्ये संख्येने, आर्थिक, सामाजिक दृष्टीने तुल्यबळ असा कोणताच समाज नव्हता. ब्राह्मणेतर हे सर्व छोट्या छोट्या जातिसमूहांत विभागले गेले होते. शिवाय तेव्हाच्या त्रावणकोर आणि कोचीन संस्थानाचे अधिपतीही तमिळी नव्हते, ते मलयाळी नायर होते. तमिळनाडूत धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतील त्यांच्या परंपरागत स्थानांमुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. ते जोपासण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. त्यातूनच बहुजनसमाजाच्या मनात ब्राह्मणांविषयी तिरस्कार निर्माण झाला.

मिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीत तीन अवस्था दिसून येतात : (१) जस्टिस पार्टीची स्थापना (१९१७), (२) स्वाभिमान संवर्धन चळवळ आणि (३) द्रविड कळघम् ची स्थापना.

वास्तविक जस्टिस पार्टी स्थापन केली, ती केरळमधील नायर समाजातील एका व्यक्तीने. जस्टिस पार्टीच्या स्थापनेत पानगल संस्थानच्या राजाचाही फार मोठा हात आहे. ब्राह्मणेतरांच्या शैक्षणिक विकासासाठी जस्टिस पार्टीने बरेच काम केले. राजकीय दृष्टीने त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. फुले-आंबेडकरांच्या चळवळीत समाजातील खालच्या थरातील लोकदेखील सामील झाले होते, तसे जस्टिस पार्टीचे नव्हते. जस्टिस पार्टीत उच्चमध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांचाच भरणा अधिक होता. जस्टिस पार्टीने ब्रिटिशांना अनुकूल अशी भूमिका १९२० सालापर्यंत उघडपणे स्वीकारली नव्हती. त्याच सुमारास ब्राह्मणेतर चळवळीबद्दल सहानुभूती बाळगणारे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांची बदली मद्रास इलाख्यला झाली. राष्ट्रीय चळवळीला आणि काँग्रेसला त्यांनी विरोध केला,कारण काँग्रेसमध्ये ब्राह्मण अधिक होते.

रामस्वामी नायकर (१८७९-१९७३) यांनी १९२५ च्या सुरुवातीला स्वाभिमान संवर्धन चळवळीला प्रारंभ केला. ही चळवळ नायकरांनी गतिशील बनवली. या चळवळीने ब्राह्मणी श्रद्धा व आचार यांच्यावर हल्ले सुरू केले. ब्राह्मणांनी द्रविड संस्कृती नष्ट केली. त्या संस्कृतीच्या उज्ज्वल कालखंडाच्या आठवणी निघू लागल्या. विवाहविधी आणि इतर धार्मिक विधींसाठी ब्राह्मणाला बोलावले जाऊ नये, असा प्रचार केला गेला. केरळमधील वायकोम सत्याग्रहात नायकरांनी भाग घेतला होता (१९२४).

मिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीला पुढे राष्ट्रविरोधी वळण लागले. स्वातंत्र्यसोहळ्यावर बहिष्कार टाकणे, राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, राज्यघटनेच्या प्रती जाळणे असे प्रकार सुरू झाले.
यातूनच पुढे द्रविड कळघम् ची स्थापना झाली. अण्णादुरै, करुणानिधी, एम्. जी. रामचंद्रन् ही नेतेमंडळी या चळवळीतूनच पुढे आली. नाटके आणि चित्रपट या माध्यामांच्या द्वारे ब्राह्मणेतर चळवळ खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली. निरीश्वरवाद, जातिनिर्मूलन, पारंपारिक आचारांना, रूढींना विरोध या गोष्टींवर तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीचा रोख होता परंतु ही चळवळदेखील परंपरेविरुद्धचे बंड अशीच होती.

हाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीपेक्षा तमिळनाडूची चळवळ अधिक उग्र होती. राजर्षी शाहूंच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची जी अवस्था होती, ती तमिळनाडूतील चळवळीत नेहमीच राहिलेली दिसते; परंतु असे असले तरी ब्राह्मणेतर चळवळीमुळे बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार झाला, राजकीय-सामाजिक जागृती निर्माण झाली, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला गती मिळाली हे मान्य करावेच लागेल. बहुजनसमाजात स्व ची जाणीव निर्माण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदीय लोकशाहीच्या प्रभावाखाली राजकीय सत्ता बहुजनसमाजाच्या, विशेषतः महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हाती आली. त्याचप्रमाणे तमिळनाडू, केरळ तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक याही राज्यांतून राजकीय सत्ता बहुजनसमाजातील लोकांच्या हाती आली.


हा : धर्मसुधारणा आंदोलन; भारतीय प्रबोधनकाल.


संदर्भ : 1. Kavlokar, K. K. Non Brahmin Movement in Southern India 1873 - 1949, Kolhapur, 1979.
           2. Pillai, S. Devdas, Ed. Aspects of Changing India, Bombay, 1976.

           ३. कीर, धनंजय, संपा. समग्र फुले वाङ्मय, मुंबई, १९७३.
           ४. जोशी, लक्ष्मणशास्त्री, ज्योति निबंध, वाई, १९४७.
           ५. बेडेकर, दि. के.; भणगे, भा. शं. संपा. भारतीय प्रबोधन, पुणे, १९७३.
           ६. सरदार, गं. बा. महात्मा फुले, मुंबई, १९८१.
Source: Marathi Vishvkosh



राज्यसेवा परीक्षांचे स्वरूप

नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी नव्या उमेदीने, नव्या ऊर्जेने आपण उभे राहतो. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जानेवारी महिना  महत्त्वाचा असतो, कारण या व यानंतरच्या काही काळात नवीन परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांपासून करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धापरीक्षेकडे विद्यार्थी वळत आहेत. खरेतर महाविद्यालयात असल्यापासूनच या परीक्षेची तयारी सुरू करणे आवश्यक आहे. आज आपण या परीक्षेचे स्वरूप समजून
घेणार आहोत.
 एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
- उपजिल्हाधिकारी (गट अ)
- पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
- तहसीलदार (गट अ)
- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
- कक्ष अधिकारी (गट ब)
- गटविकास अधिकारी (गट ब)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद,  (गट ब)
- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
- नायब तहसीलदार (गट ब)
 महसूल सेवा
* उपजिल्हाधिकारी
हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश
मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती
अद्ययावत ठेवणे.
- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.
* तहसीलदार
या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
* नायब तहसीलदार
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.
ल्ल महाराष्ट्र पोलीस सेवा
राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.
* महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.
* विक्रीकर (व्हॅट) विभाग
विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या- प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.
* मोटार वाहन विभाग - हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.
* राज्य उत्पादन शुल्क विभाग
उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.
* राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक- या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.
* कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप
कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली तरी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कक्ष अधिकाऱ्याला असतात.
* मंत्रालयीन पदस्थापना
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात.   
source: loksatta newspaper

Sunday, January 4, 2015

आर्य समाज:

 सं स्था प क - आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हें काठेवाडांतील मोरवी संस्थानातल्या एका खेडयांत १८२४ सालीं जन्मले. त्यांनीं आपल्या हयातींत आपलें मूळ नांव किंवा जन्मस्थान कधीहि कोणास सांगितलें नाहीं; व याचें कारण, अंगीकारलेल्या धर्मकार्यांत नातेवाईक येऊन अडथळा करतील किंवा मरणोत्तर समाजाचा अधिपति म्हणून कोणी आपला नातेवाईक वारसा हक्क सांगू लागेल, असें स्वामी सांगत असत. तथापि १८८३ मध्यें स्वामी परलोकवासी झाल्यावर त्यांचें खरें नांव मूलशंकर अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर हे ब्राह्मण जातीचे शैवपंथी सुखवस्तु गृहस्थ असून त्यांचा धंदा पेढीवाल्याचा होता. मूलशंकर उर्फ स्वामी दयानंदसरस्वती यांच्या आयुष्याचे तीन विभाग पडतात. पहिला. पूर्व वय (१८२४-१८४५), दुसरा प्रवास व अध्ययन (१८४५-१८६३), तिसरा सार्वजनिक कार्य (१८६३-१८८३). आयुष्यांतील पहिल्या दोन विभागांची माहिती स्वामींनीं स्वतः लिहून ठेवलेल्या आत्मचरित्रावरून चांगली मिळते. आर्यसमाजाच्या या संस्थापकाच्या धर्मबुध्दीसंबंधानें त्याच्या पूर्व वयांत तीन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. पहिली चवदाव्या वर्षीच मूर्तिपूजेविरुध्द केलेले बंड. त्याचें कारण शैव संप्रदायानुसार एका शिवरात्रीच्या दिवशीं उपोषण करून रात्री शिवालयांत भजन पूजन व जाग्रण करीत असतां त्यांनीं शिवाच्या मूर्तीवर एक उंदीर इकडे तिकडे बागडतांनां व नैवेद्य खातांनां पाहिला. दुसरी गोष्ट संसारत्याग करून मोक्ष मिळवण्याचा त्यानें केलेला निश्चय; याचें कारण बहिणीच्या मृत्यूमुळें त्यांनां झालेलें अपरंपार दुःख. तिसरी गोष्ट एकविसाव्या वर्षी त्यांनीं केलेला गृहत्याग. याचें कारण त्यांच्या आईबापांनीं जुळवून आणलेला विवाह टाळण्याची त्यांची इच्छा. याप्रमाणें मूर्तिपूजेविरुध्द बंड, मोक्ष मिळवण्याचा निश्चय, आणि संसारत्याग या तीन गोष्टींनीं स्वामींच्या भावी आयुष्याचा पाया घातला गेला या पूर्व इतिहासाबद्दल कोणास शंका येण्याचें कारण नाहीं. कारण स्वामीचें मूर्तिपूजेविरुध्द मत अखेरपर्यंत कायम होतें, आणि मूर्तिपूजेविरुध्द चळवळ स्वामींनी हरिद्वार काशी, इत्यादि प्रमुख क्षेत्रीं केली. संसाराबद्दलच्या त्यांच्या विरक्तीबद्दलहि कोणास संशय घेण्याचें कारण नाहीं. कारण स्वामींनीं एकदां जें घर सोडलें तें आप्तेष्टांचें दर्शन घेण्यास सर्व हयातींत एकदांहि ते गृहाकडे गेले नव्हते.
घर सोडल्यानंतर अठरा वर्षे स्वामीनीं संन्याशी होऊन प्रवास करण्यांत व निरनिराळया गुरूंपासून ज्ञान संपादण्यांत घालविलीं, त्यांत प्रथमपासूनच त्यांच्या मनावर वेदग्रंथांचा फार परिणाम झाला व व्यक्तिगत आत्मा आणि परत्मात्मा एकच असल्याबद्दल त्यांची खात्री पटली. ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन त्यांचें नांव शुध्दचैतन्य असें ठेवण्यांत आलें. पुढें चवथ्या संन्यासाश्रमाची दीक्षा देऊन त्यांनां दयानंद सरस्वती हें नांव देण्यांत आलें. तथापि पुढें लवकरच स्वामी वेदांतमार्ग सोडून योगमार्गाकडे वळले; आणि त्यानंतर स्वामींच्या चरित्रावर अखेरचा धार्मिक परिणाम मथुरा येथें रहाणाऱ्या स्वामी विरजानंद सरस्वती नांवाच्या एका अंध वैदिक विद्वानाचा झाला. हा वैदिक अलीकडील संस्कृत वाङ्मयाचा पक्का द्वेष्टा होता. त्यानें वेद शिकविण्यास आरंभ करण्यापूर्वी सर्व अलीकडील संस्कृत ग्रंथ फेंकून देण्यास सांगितलें व दयानंदांनीं तसें केल्यावर त्यांनां वेद शिकवले. वेदाध्ययन पुरें झाल्यावर त्या अंध गुरूनें ''आतां जगांत हिंडून मनुष्य जातीला आपल्या ज्ञानाचा उपदेश कर'' अशी आशीर्वादात्मक आज्ञा केली. येथें दयानंदाच्या आयुष्याचा दुसरा भाग संपतो.
स्वामींच्या धार्मिक मतांचा इतिहास थोडक्यांत पुढील प्रमाणें आहे. प्रथम पौराणिक ग्रंथांतील मतांचा, नंतर तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांतील मतांचा, आणि अखेर वैदिक ग्रंथांतील मतांचा पगडा त्यांच्या मनावर पडला.
स्वामी शैवपंथ सोडून वेदांतमार्गी बनले, व शेवटी सांख्य योगाला शेवटपर्यंत चिकटून राहिले. सर्व वेदग्रंथांचा अर्थ सांख्ययोगपर लावला पाहिजे असें त्यांचें मत होतें. आयुष्याची शेवटली वीस वर्षे स्वामींनीं सार्वजनिक कार्यांत घालविलीं. या काळांत धर्मोपदेश करीत सर्व हिंदुस्थानभर ते फिरले. पुण्यामुंबईपासून कलकत्त्यापर्यंत व उत्तरेस लाहोरपर्यंत मोठमोठे पंडित, मौलवी व मिशनरी यांच्या बरोबर त्यांनी वादविवाद केले. प्रथम चार वर्षे स्वमतप्रतिपादन केल्यावर अधिक ध्यानमनन करण्याकरितां व चारित्र्य उत्तम बनविण्याकरितां ते गंगेच्या कांठीं जाऊन राहिले. या अल्पकालीन एकांतवासांत असतांनां स्वामींस प्रत्यक्ष भेटून आलेल्या एका यूरोपीय मिशनऱ्यानें त्यांचें वर्णन पुढीलप्रमाणें लिहून ठेविलें आहेः -
'सायंकालीं नदीच्या वाळवंटांत पाण्याच्या कांठाजवळ बसलेल्या एका फकीराची भेट मीं घेतलीं. त्याच्या विद्वत्तेबद्दल व पवित्राचरणाबद्दल मी अगोदर बाजार पेठेंत पुष्कळांच्या तोंडून ऐकलें होतें. त्या ठिकाणीं तो फकीर एका गवताच्या आसनावर बसलेला होता. त्याचें शरीर भीमासारखे भक्कम व जाडजूड असून चेहरा पाणीदार होता. तो बहुतेक नग्नप्राय स्थितींत होता. मी जवळ गेल्याबरोबर त्यानें आनंदानें संभाषणास सुरुवात केली. संसाराचा पूर्ण त्याग करून परमेश्वरचिंतनांत तो काल घालवीत असे. झालेल्या संभाषणावरून सदरहू फकीराचें मन सुसंस्कृत आणि बुध्दि प्राचीन वैदिक ग्रंथांत तरबेज असल्याचें दिसून आलें. तो संस्कृतमध्यें बोलत होता त्यामुळें आमचें संभाषण एका दुभाष्या मार्फत झालें'
सुमारें अडीच वर्षांनीं स्वामी दयानंद एकांतवास सोडून पुन्हां सार्वजनिक वादविवाद करीत फिरूं लागले. हिंदूंचे प्रसिध्द क्षेत्र काशी वगैरे ठिकाणीं ते मुद्दाम वेदामध्यें मूर्तिपूजा आहे काय? या विषयावर व्याख्यानें देत असत. मूर्तिपूजेविरुध्द त्यांनीं फार जोराची मोहीम सुरू केली. व त्या कामीं आपला दृढनिश्चय तसेंच स्वतःचे मोठें वजन आणि असामान्य वक्तृत्व त्यांनी खर्च केलें.
मुंबई येथें १८७५ एप्रिल १० रोजीं स्वामी दयानंदांनीं आपला आर्यसमाज स्थापन केला. १८७७ मध्यें दिछी येथें भरलेल्या बडया दरबाराच्या वेळीं हजर राहून स्वामींनीं पंजाबांतील कांही सुप्रसिध्द गृहस्थांच्या गांठी घेतल्या. तेव्हां पंजाबांत येण्याबद्दल त्यांनां आमंत्रण झालें. तें मान्य करून स्वामी त्या प्रांतांत गेले. ती त्यांची पंजाबला पहिलीच भेट होती. त्यांच्या संस्थेनें पुढें जेथें विजय मिळविले तें क्षेत्र हेंच होय. १७८८ ते १८८१ या काळांत आर्यसमाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी यांच्या दरम्यान मोठा चमत्कारिक संबंध आला; पण पुढें दोघे परस्पराबद्दल नाखूष झाले; कारण देवाच्या प्रत्यक्ष स्वरूपाबद्दल त्यांच्यामध्यें मोठा मतभेद उत्पन्न झाला. याशिवाय स्वामी दयानंदाचा ब्रह्मसमाजाचे देवेंद्रनाथ ठाकूर आणि केशवचंद्रसेन, थिऑसॉफिकल सोसायटीचे मॅडम ब्लॅव्हाटस्की आणि कर्नल आल्कॉट, प्रार्थनासमाजाचे भोलानाथ साराभाई, सुधारक मुसुलमानी पंथाचे सर सय्यद अहमद, आणि ख्रिस्ती पंथाचे डॉ. टी. जे. स्कॉट आणि रेव्ह. जे. ग्रे इत्यादि निरनिराळया संप्रदायांच्या पुढाऱ्यांशीं संबंध आला. स्वामीं दयानंदांनीं प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज व आर्यसमाज सर्व एक करावे अशी सूचना त्या त्या समाजाच्या पुढाऱ्यांनां केली होती; पण ती कोणासच मान्य झाली नाहीं.
१८८२-१८८३ मध्यें स्वामींनीं राजपुतान्याला भेट दिली आणि तेथें ते अनेक संस्थानिकांचे स्नेही व सल्लागार बनले. जोधपूरच्या महाराजांची बदफैली वर्तनाबद्दल स्वामींनीं चांगली कानउघाडणी केली असें सांगतात. या नंतर लवकरच स्वामी आजारी पडले. त्यांना अन्नामधून विषप्रयोग केला गेला असें कोणी म्हणतात. तें कांहीं असलें तरी हें मात्र खरें कीं, त्याच दुखण्यांत स्वामींचा शेवट झाला. १८८३ आक्टोबर ३० रोजीं अजमीर येथें स्वामी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी परलोकवासी झाले.
स्वामी दयानंदांची प्रकृति फारच चांगली, चेहरा भव्य आणि मन दृढनिश्चयी होतं. मूर्तिपूजकांबरोबरच्या वादविवादांत महामूर्ख हें विशेषण त्यांच्या तोंडून फार येत असे. त्यांचें संस्कृत ग्रंथांतील पांडित्य, समयसूचकता आणि आत्मविश्वास मोठया पुढाऱ्याला योग्य अशींच होतीं.

सत्यशोधक समाज :

 सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्घा यांचे निर्मूलन करुन वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, तात्त्विक बैठक, कार्य व उपक्रम यांसंबंधी माहिती म. फुले व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या प्रासंगिक निबंध व छोटीखानी पुस्तिकेतून (सार्वजनिक सत्यधर्म) मिळते.

पार्श्वभूमी : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पाश्चात्त्य सुधारणेचे स्वागत करणाऱ्या प्रवृत्तीचे तीन प्रवाह महाराष्ट्रात स्वतंत्र रीत्या प्रभावीपणे वाहताना दिसतात. पहिला प्रवाह, धार्मिक सुधारकांचा असून तो मुख्यत्वे बाह्मो समाज (स्थापना १८२८) व प्रार्थनासमाज (स्थापना १८६४) यांत व्यक्त झाला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामचंद्र गोपाळ भांडारकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर इ. मंडळी यात अगणी होती. दुसरा प्रवाह, बुद्घिवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. आगरकरांसारखे जडवादी किंवा अज्ञेयवादी त्यात अगेसर होते. तिसरा मोठा प्रवाह, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरुद्घ बंड करणाऱ्या बाह्मणेतरांच्या - बहुजनसमाजाच्या - चळवळीचा होता. ह्याचे आद्यजनक महात्मा जोतीराव फुले होते. या तिन्ही सुधारणा प्रवाहांची सर्वसंमत वैशिष्ट्ये अशी : (१) पाश्चात्त्य विज्ञान पूर्णतः स्वागतार्ह आहे. (२) धर्माशी प्रत्यक्ष सोयरिक नसलेले आधुनिक शिक्षण हाच खरा सुधारणेचा पाया आहे. (३) चातुर्वण्याचे तत्त्वज्ञान किंवा जातिभेद ही संस्था व्यक्तिविकासाला मारक व एकात्म समाजाच्या घडणीतील अडसर असल्यामुळे तिचे समूळ उच्चटन व्हावे; कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या पायावर लोकसत्ताक राज्यव्यवस्था भारतात निर्माण होण्याची गरज आहे; मात्र तत्पूर्वी सामाजिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. या सर्व तत्त्व-सूत्रांचा प्रारंभ कुटुंबसंस्थेत आणि विवाहसंस्थेत बदल करण्यापासून होतो. त्याकरिता स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वातंत्र्य यांचा पुरस्कार अपरिहार्य ठरतो. ही सर्वसंमत वैशिष्ट्ये या तिन्ही सुधारणा प्रवाहांत - चळवळीत असली, तरी महाराष्ट्रातील बहुजनसमाजातील सुधारकांचे - बाह्मणेतर सुधारकांचे-प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित, तर ब्राह्मण सुधारकांचे प्रश्न पांढरपेशा उच्च्वर्णीयांच्या जीवनाशी संबद्घ होते. त्यामुळे हिंदू धर्माच्या पूर्वपरंपरेवर मूलोच्छेदी प्रहार करण्याची तीव्र व कठोर प्रवृत्ती निर्माण झाली आणि साधारणतः प्रार्थनासमाजाच्या धर्तीवर पण शूद्रातिशूद्रांच्या खास उद्घारार्थ सत्यशोधक समाजाची स्वतंत्र, स्वावलंबी व पुरोगामी विचारांची संघटना स्थापन करण्यात आली.

महात्मा फुले यांच्या या उच्छेदक प्रवृत्तीला अनेक कारणे आहेत. त्यांतील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धामधील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, बाह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतील ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार व लाचलूचपत अशी बेबंदशाही व अनागोंदी होती. साहजिकच त्या काळी महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सामाजिक जीवनात बाह्मणांचे धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक व समर्थक वर्ग विशेषेकरुन ब्राह्मण वर्ग होता. ह्या चौकटीविरुद्घ बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रुपाने जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रुपाने धगधगणाऱ्या बंडाचे निशाण हाती घेतले. धर्माचे मनुजवैरी गुंतवळ आणि ते जपणारे समाजघटक यांच्या अनिष्ट प्रवृत्तींविरुद्घ, जवळजवळ सर्व आघाडयंवर त्यांनी युद्घ पुकारले.

तात्त्विक बैठक : महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरुद्घ महान सत्य कोणते, असा प्रश्न उपस्थित करुन म. फुल्यांनी म्हटले आहे, ‘‘ स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरुष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय. प्रत्येकाला स्वमताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे. शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्याची थोरवीच सिद्घ होते. सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. या विश्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे; एवढेच नव्हे, तर ही ईश्वराची पूजा आहे. भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही; कारण तो सर्व विश्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही. बायबल मध्ये येशू क्रिस्तांनी माणसाने माणसाशी कसे वागावे, यासंबंधी केलेला उपदेश माणसाने अंमलात आणला, तर मनुष्यजातीचे जीवन पूर्ण सफल झाले असे समजावे ’’. म. फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग चर्चा केली आहे. ‘‘ शुद्घ सत्य हे धर्मग्रंथात किंवा ऋषी, गुरु, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही; ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्घीत वास करते. निसर्गातील सत्य व नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करुन देणारी बुद्घी (रीझन) मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानेच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे. ईश्वराने - निर्मिकाने - मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे; तो म्हणजे बुद्घी होय ’’. म. फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुद्घिवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाही; मात्र ‘ निर्मिका ’ चे म्हणजे सृष्टिनिर्मात्याचे अस्तित्व ते मान्य करतात. निर्मिकाचे सर्वन्यायीपण सिद्घ करण्यासाठी म. फुले यांनी केलेला सज्जड युक्तिवाद मात्र विज्ञानाच्या कसोटीवर कितपत उतरेल ? याबद्दल शंका आहे.
कार्य व उपक्रम : सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म. फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली.मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरुवातीस म. जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्घतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरुवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिक रीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सद्यःस्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरुप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सावयव रुपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारुच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.

सर्व सभासदांनी सत्याचा प्रसार व सद्विचार लोकांत प्रसृत करुन मानवी हक्क व कर्तव्ये यांचा प्रसार-प्रचार वृत्तपत्रे-व्याख्यानांद्वारे करावा. म. फुल्यांनी दलितांना, स्त्रियांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम प्राधान्याने हाती घेतला. शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावे आणि सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला. विद्येची महती त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात चपखल शब्दांत वर्णन केली आहे. ते म्हणतात, “ विद्येविना मति गेली; मतिविना नीति गेली; नीतिविना गति गेली; गतिविना वित्त गेले; वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले. “ अज्ञानगस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच त्यांनी मुलींसाठीही शाळा काढल्या. त्यासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन अध्यापनही केले. ज्ञानवृद्घिकारक उपायांना बळकटी देण्यासाठी त्यांनी गरीब  व होतकरु विद्यार्थ्यांना विद्यावेतने व हुशार विद्यार्थ्यांना बक्षिसे ठेवली. निबंधलेखन व वक्तृत्वस्पर्धा यांना उत्तेजन दिले. वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे एक सहकारी कृ. पां. भालेकर यांनी वसतिगृह स्थापून परगावच्या गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था केली. म. फुल्यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात (१८८२) सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. पाझरणीच्या सिद्घांताला कडाडून विरोध केला. त्यासाठी लोकहितकारक असे उपायही सुचविले.

सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला. दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला. नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या ग्रंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. तसेच अनिष्ट अंधश्रद्घामूलक परंपरा, चालीरीती, रुढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी ते, विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतून समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या उपकमाला काही अंशी यश लाभले.

महाराष्ट्राबरोबरच बृहन्महाराष्ट्रातील काही शहरांतून म. फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या, लोकशिक्षणाच्या चळवळीला वेग आला. कृष्णराव पांडुरंग भालेकर, स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावरु, डॉ. विश्राम रामजी घोले, डॉ. संतुजी रामजी लाड, सावळाराम दगडूजी घोलप, महादेव गणेश डोंगरे, हरिश्चंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, आण्णा बाबाजी लठ्ठे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत, वा. रा. कोठारी, सखाराम पाटील, मुकुंदराव गणपत पाटील, अ‍ॅड. गणपतराव कृष्णाजी कदम, भास्करराव जाधव, हनुमंतराव साळुंखे-पाटील, दांडेगावकर, अ‍ॅड. केशवराव बागडे, आनंदस्वामी, रामचंद्र आसवले, केशवराव विचारेगुरुजी, ज्योत्याजीराव फाळके-पाटील, रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ ‘ दासराम ’, सदोबा गावडे, बंडोबा तरवडे, धोंडीराम नामदेव कुंभार, रामचंद्र गोविंद जामदार, भोसले - सावंत, भाई माधवराव खंडेराव बागल, पुढारी कार ग. गो. जाधव, ‘ सत्यवादी ’ कार बाळासाहेब, समाज कार सर्जेराव पाटील, बाळासाहेब देसाई, रायभान जाधव, अ‍ॅड. झुलाल पाटील, दौलतराव गोळे, व्यंकटअण्णा रणधीर, नलिनीताई लढके, अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्राचार्य गजमल माळी, ल. ब. मिसाळ, रामभाऊ फाळके, अ‍ॅड. पी. बी. कडू - पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, अ‍ॅड. डी. एस. खांडेकर, माधवराव मुकुंदराव पाटील, अ‍ॅड. द. रा. शेळके, अ‍ॅड. ना. ह. सावंत, जी. ए. उगले, ग. पां. लोके, बाबा आढाव, हरिभाऊ मुळे, उत्तम नाना पाटील व अ‍ॅड. वसंतराव ऊर्फ भाऊ फाळके-पाटील यांसारख्या मोजता येणार नाहीत अशा अनंत छोट्या-मोठ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळ नेटाने पुढे नेली/आजही प्रयत्न चालू आहेत. परिणामी, संपूर्ण समाजक्रांतीचे युग अवघ्या महाराष्ट्रात सळसळून उभे राहिले. मधे काही काळ, विशेषतः म. फुले यांच्या मृत्यूनंतर (१८९०) तसेच भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्यानंतर (१९४७) सत्यशोधक चळवळ खूपच मंदावली, उपेक्षित राहिली; मात्र शंकरराव मोरे, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, दिनकरराव जवळकर, लोकशाहीर पिराजीराव सरनाईक प्रभृती व त्यांचे खंदेबल्लळ सहकारी यांनी सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित केली, गतिमान केली आणि खेड्यापाड्यांतल्या, तळागळातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचा आणि रुजविण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी ती उभ्या महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रचंड रणसंग्रामात, सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम राहिला. त्यामुळे सत्यशोधक चळवळ विस्कळीत झाली; तशीच स्वातंत्र्योत्तर काळात, ‘ आता स्वातंत्र्य प्राप्त झालं, उद्दिष्ट साध्य झालं; म्हणजे दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाची निकड उरली नाही’, अशी बव्हंशी बहुजन समाजाने समजूत करुन घेतली. समोरची उद्दिष्टेही वेगवेगळी झाली. शिवाय मोठ्या प्रमाणात बाह्मणेतर समाज विविध राजकीय पक्षांत विभागला गेला. अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळे सत्यशोधक चळवळ नुसती मंदावली असेच नव्हे, तर थंडावलीही अशी इतिहासाची नोंद आहे. मात्र इतिहासाकडे पाठ करुन ती पुन्हा उसळी मारुन फोफावू लागली, ती धारदार विचारांनी दृढ असलेल्या, कडेलोट झाला तरी मागे हटणार नाही या जिद्दीने पेटलेल्या, त्या त्या काल-परिस्थितीमधील नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या-नेतृत्वाच्या अभंग निष्ठांवर ! सांप्रत जाणवणारे तिचे अस्तित्वही याच ज्वलजहाल आधारावर उभे आहे. 
ग्रंथव्यवहाराची मांदियाळी : म. फुले यांच्यापासून (१८७३) आजतागायत (२००८) सत्यशोधक चळवळीचे गतिमान, वाढते यश, निरनिराळे उपक्रम, कार्यकम हाती घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर निर्भर आहे. कालमानानुसार त्यात बदल, काही सुधारणा संभवत असल्या तरी, छोट्या-मोठ्या सभा, शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकरी-कामकरी-कष्टकऱ्यांच्या संघटना, स्पृश्य-अस्पृश्य-महिला अशा ‘शूद्रातिशूद्र’ समाजघटकासांठी शाळा उघडणे, परिवर्तन शिबिरे आयोजित करणे, नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती, दुष्काळ, महापूर या संकटांच्या वेळी पुनर्वसनशिबिरे आयोजित करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची/पुलांची कामे घेणे, निबंध लिहून त्याचे वाचन करणे, छोट्या छोट्या पुस्तिका लिहिणे, सभा-संमेलने-अधिवेशने भरवून बहुजन समाजाला-बाह्मणेतर समाजाला व सरकारला परखडपणे काही गोष्टी सुनावून कृती करायला भाग पाडणे आणि छोटी छोटी नियतकालिके काढून त्यांद्वारा प्रभावी व प्रवाही प्रचार करणे, असे या लोकप्रबोधनकार्याचे सर्वसाधारण स्वरुप राहिले आहे. लोकशाहीमधील लोककल्याणाच्या संस्थांमध्ये प्रवेश करणे, त्यांची स्थापना करणे आणि मोठ्या प्रमाणात ग्रंथव्यवहाराचे प्रकाशन करणे, हे त्याचेकालसुसंगत असे सांप्रतचे दोन पदर आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील म.फुले समता प्रतिष्ठान, ‘एक गाव, एकपाणवठा ’ किंवा ‘ देवदासींचे पुनर्वसन ’, यांसारख्या चळवळी, भाई माधवराव बागल विद्यापीठ (कोल्हापूर) या स्वयंसेवी विद्यासंकुलातर्फे शेतकरी-कामगार-महिला-विद्यार्थी यांसारख्या दुबळ्या घटकांसाठी सातत्याने राबविले जाणारे विधायक उपक्रम, म. फुले सामाजिक समता प्रतिष्ठानच्या वतीने मागासवर्गीय व तत्सम यांच्या उद्घारार्थ छेडली जाणारी आंदोलने आणि केले जाणारे संघटन अशा संस्था आणि त्यांचे उपक्रम हे सत्यशोधक चळवळीचेच आविष्कार आहेत. वानगीदाखलची ही यादी पुरेशी ठरावी.

अधिवेशने/संमेलने : कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाट्याने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरु होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्घीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरुवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरु यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.

या प्रबोधन चळवळीचा भाग म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटना काम करीत असल्याचे दिसते. मात्र तिला तसे अधिकृत स्वरुप असल्याचे आढळत नाही. प्रशिक्षण वर्ग भरत असले, तरी त्याचे स्वरुप आस्था असणाऱ्यांपुरते मर्यादित असे. मात्र शेतकऱ्यांचे नेते कांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कल्पनेने सत्यशोधक साहित्यसंस्थेसंबंधी, २००१-०२ मध्ये उचल खाल्ली, अथक प्रयत्नाने ही कल्पना साकार कशी होईल हे पाहिले. स्वतः नागनाथ अण्णा, अ‍ॅड. भाऊ फाळके-पाटील, प्रा. उगले, डॉ. एस्. एस्. भोसले, प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. कल्याणकर, डॉ. आ. ह. साळुंखे, भूमिसत्ता चे संपादक भगतुर, प्रा. गुंदेकर, डॉ. गुरव, प्राचार्य टेकाळे, प्रा. श्याम मुंडे, प्रा. अनिल पाटील, प्रा. गजमल माळी, स्वातंत्र्यसैनिक भा. दो. पाटील, डॉ. काठोळे, प्रा. ढवळे, डॉ. सुरेश सावंत, डॉ. शशी चौधरी प्रभृतींनी कष्टपूर्वक ती लोकमानसात रुजविली. कमाने ‘ सत्यशोधकीय साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदे ’ च्या रीतसर नोंदणीमुळे सत्यशोधक चळवळीला जास्तीचे बळ लाभले आहे. सत्यशोधक कोश निर्मितीचे कार्य (सत्यशोधक चळवळीतील संस्था, व्यक्ती, ग्रंथ आणि नियतकालिके यांचा कोश : १८७३ ते २००६), उद्योगपती पद्माकरराव मुळे यांच्या नेतृत्वाने हाती घेण्यात आले आहे.

सत्यशोधकीय नियतकालिके : सत्यशोधक चळवळीने अनेक प्रचार-माध्यमे उपयोगात आणली. त्यामध्ये सत्यशोधकीय नियतकालिकांचा अगकमाने समावेश करावा लागतो. याद्वारा धार्मिक/सामाजिक क्षेत्रांत जनजागृतीचे अफाट कार्य केले. धर्मचिकित्सा, निरर्थक मूर्तिपूजेस विरोध, समाजाला पिचवून टाकणाऱ्या रुढीपरंपरांच्या चौकटींना नकार, जाति-निर्मूलन, शेतकरी-अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या उन्नतीसमृद्घीचा कृतिशील विचार, अशा अनेकस्पर्शी उपकमांसाठी या प्रचारमाध्यमांचा, आत्यंतिक कडवेपणाने व निष्ठापूर्वक जाणिवेने सत्यशोधक समाजाकडून अवलंब करण्यात आला. सर्वांगांनी प्रचार, प्रचारकांची निर्मिती, जलसे, मेळे हे तर त्यात होतेच; मात्र चळवळीची म्हणून जी नियतकालिके या काळात निघाली/निघत राहिली त्यांचे स्थान, सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात अनन्यसाधारण असे आहे. बहुजन समाजाच्या प्रगमनशील, सामाजिक ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा हा लखलखता आविष्कार डोळे दिपविणारा आहे. सर्वसाधारणपणे चार इयत्तापर्यंत शिक्षण झालेले, या नियतकालिकांचे बहुजनसमाजातील संपादक वृत्तपत्रक्षेत्रास अनभिज्ञ होते. अनुभव, पार्श्वभूमी, परंपरा, साधने या सगळ्याच दृष्टीने अभावगस्त होते. मात्र समाजासंबंधीची अपार बांधीलकी, अतूट ध्येयवाद आणि अभंग जिद्द अशा पुंजीवर ह्या पत्रकारितेचे गाडे रेटले जात होते. सोने-नाणे गहाण टाकले, जमीन-जुमल्याचा लिलाव झाला, लेखनकामांपासून ते स्वतःच अंक पोस्टात नेऊन टाकण्याचे नित्यकर्म करावे लागले, बायका-मुलांची हेळसांड झाली; पण सत्यशोधक चळवळीतील पत्रकारितेने मागे वळून पाहिले नाही. बहुजनसमाजाच्या अपरंपार आस्थेमुळे एकात्म समाजाच्या निर्मितीच्या समर्पित भावनेमुळे हे घडत गेले.
सत्यशोधक चळवळीच्या ऐन बहराच्या काळात - १८७३ ते १९४० - अशी जवळपास ६०/६५ नियतकालिके निघाली. त्यापुढच्या अर्धशतकाहून अधिकच्या काळात - स्थूलमानाने २००७ अखेर - त्याहून तितकीच किंबहुना त्याहून अधिकच नियतकालिके प्रसिद्घ झाली. त्याची स्थूलमानाने नोंद पुढीलप्रमाणे करणे शक्य आहे :

समाजनिष्ठ ग्रामीण पत्रकारितेचे हे अपूर्व पर्व सुरु झाले ते दीनबंधु (१८७७- कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे) व संत्सार (१८८५- म. फुले) यांच्या पत्रकारितेने. दीनमित्र (१८८८- गणपतराव पाटील), राघवभूषण (१८८८- गुलाबसिंह कौशल्य), अंबालहरी (१८८९- कृष्णराव भालेकर), शेतकऱ्यांचा कैवारी (१८९२- कृष्णराव भालेकर), मराठा दीनबंधू (१९०१- भास्करराव जाधव), दीनमित्र (१९१०- मुकुंदराव पाटील), विश्वबंधू (१९११- बळवंतराव पिसाळ), जागृती (१९१७- भगवंतराव पाळेकर), जागरुक (१९१७- वालचंद कोठारी), डेक्कन रयत (१९१८- अण्णा-साहेब लठ्ठे), विजयी मराठा (१९१९- श्रीपतराव शिंदे), सत्यप्रकाश (१९१९- नारायण रामचंद्र विभुते), गरिबांचा कैवारी (१९२०- बाबूराव यादव), भगवा झेंडा (१९२०- दत्ताजीराव कुरणे), तरुण मराठा (१९२०- सखाराम पांडुरंग सावंत), राष्ट्रवीर (१९२१- शामराव देसाई), प्रबोधन (१९२१- के. सी. ठाकरे), संजीवन (१९२१- द. भि. रणदिवे), सिंध मराठा (१९२४- दत्तात्रय वासुदेव अणावकर), हंटर (१९२५- खंडेराव बागल), मजूर (१९२५- रामचंद्र लाड), कर्मवीर (१९२५- शि. आ. भोसले), नवयुग (१९२६- बाबासाहेब बोले), सत्यवादी (१९२६- बाळासाहेब पाटील), बाह्मणेतर (१९२६- व्यंकटराव गोडे), कैवारी (१९२८- दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिकांची रांगच आहे. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. त्याचबरोबर जागृती हे नियतकालिक बडोद्याहून, तर सिंध मराठा हे कराचीहून म्हणजे परप्रांतांतून प्रसिद्घ होत होते. राघव भूषण, येवला (जिल्हा नासिक); दीनमित्र, तरवडी (जिल्हा अहमदनगर) अशा ग्रामीण भागांतूनही अशी काही नियतकालिके प्रकाशित होत होती.

सत्यशोधक समाजाचे १९११ ते २००८ अखेरच्या अध्यक्षांची मालिका मोठी असून त्यात एकापेक्षा एक श्रेष्ठ तळमळीच्या समाजकार्यकर्त्यांची मांदियाळी मोठी आहे. सत्यशोधक समाजाची  अध्यक्ष म्हणून धुरा विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरु यांनी दि. १७ एप्रिल १९११ ते ३१ मार्च १९१२ पर्यंत सांभाळली आणि एकविसाव्या शतकात ही धुरा अ‍ॅड. वसंतराव फाळके (१५ एप्रिल २००१ ते आजतागायत -२००८) समर्थपणे सांभाळीत आहेत. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ हे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेटाने नेत आहेत.

शेती-शेतकरी, कष्टकऱ्यांची दैना, स्त्रिया-अस्पृश्य यांचे दारिद्य, प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता, धर्मचिकित्सा व सामाजिक पुनर्रचना, वंचित व उपेक्षित समाजघटकांचे विदारक प्रश्न, कामगारांचे लढे, त्यांची  एकजूट, अंधश्रद्घांचे निर्मूलन, अधिकाऱ्यांची अरेरावी व खाबुगिरी असे अनंत प्रश्न या नियतकालिकांनी समर्थपणे हाताळले. जे जे जनहिताचे आणि मनुजवैरी व्यवस्थेचे समर्थक, त्या साऱ्यांचा परखड परामर्श अत्यंत निर्भयपणे इथे घेण्यात आला. अतिशय तिखट असे हे वैचारिक बंड आहे. त्याचा उद्देश स्पष्ट असल्याने त्यामध्ये विचारांचे सामर्थ्य ठासून भरले आहे; त्यामानाने वाङ्मयनिर्मितीची कलात्मकता त्यात कमी आढळते, त्यात एकांगीपण, पुनरुक्ती अधिक आहे, बोचरेपणा खूप आहे. झोंबणारा उपहास तीव्र आहे. मात्र त्यातला आवेग, जोश आणि आवेश विलक्षण आहे. सत्यशोधक समाजाच्या आणि त्याद्वारे प्रवर्तित झालेल्या सत्यशोधक चळवळीच्या कार्याचे मूल्यमापन करताना लोकमान्य प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात, ‘‘ हिंदुस्थानातील तत्कालीन खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेली आधुनिक भारतामधील सत्य-शोधक चळवळ ही पहिली प्रबोधनपर चळवळ आहे. हजारो वर्षांपासून पिचलेल्या आणि शोषित अशा कष्टकरी जनसमूहाने तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेविरुद्घ मानवी जन्म, मानवी पत आणि मानवी प्रतिष्ठा तसेच विषमता, अज्ञान, आत्मोन्नती आणि शोषणमुक्ती यांसाठी पुकारलेली ती विराट लोकचळवळ होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समतेचे जागरण, त्यामधून एकात्म समाज सत्यशोधक चळवळीला अभिप्रेत होता ’’. पुढे ते म्हणतात, ‘‘ बाह्मणेतर वादासंबंधीचा खरा झगडा, पूर्वपरंपरेविरुद्घ नवीन ज्ञानाच्या आविष्काराने निर्माण झालेल्या विचारसरणीने उठविलेले बंड हा होता. बाह्मणेतरवाद ही एक विचारसरणी आहे. उच्च्नीचत्वाच्या, जातिभेदाच्या, स्थितिस्थापकत्वाच्या ध्येयाविरुद्घ हा लढा होता. जातिभेद आणि तो कायम ठेवण्यासाठी प्रचारात असलेला सामाजिक ध्येयवाद आणि प्रवर्तक तत्त्वे यांविरुद्घ बाह्मणेतर चळवळ एक बंड आहे.’’ ‘पृथ्वीवर त्या लोकशाही राज्याची संकल्पना ’ तिने मांडली, असा यथार्थ अभिप्राय ज्योतिनिबंध या आपल्या छोट्या चणीच्या मोठ्या पुस्तकात तर्कतीर्थांनी नोंदविला आहे.

संदर्भ : 1. Keer, Dhananjaya, Mahatma Jotirao Phooley : Father of Social Revolution, Bombay, 1974.
२. उगले, जी. ए. सत्यशोधक समाज अधिवेशने : चिंतन आणि चिंता, औरंगाबाद, २००७.
३. जाधव, रा. ग. संपा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : लेखसंगह, पुणे, १९८२.
४. जोशी, महेश, सत्यशोधक समाजाचा इतिहास, पुणे,१९८७.
५.जोशी, लक्ष्मण-शास्त्री, ज्योतिनिबंध, वाई, १९४७.
६. फडके, य. दि. संपा. महात्मा फुले समग वाङ्‌मय, मुंबई, १९९१.
७. भोसले, एस्. एस्. संपा. कांतिसूक्ते : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, मुंबई, १९७५.
८. माळी, गजमल,सत्यशोधक समाजाचा इतिहास, औरंगाबाद,२००८.
९. वाघ, प्राजक्ती आणि इतर, संपा. सत्यशोधकीय साहित्य संमेलने-अध्यक्षीय भाषणे, देउळगावराजा, २००७.
१०. साळुंखे, पी. बी. आणि इतर, संपा. महात्मा फुले गौरव ग्रंथ, मुंबई, १९८२.

भोसले, एस्. एस्.; माळी, गजमल
 source: marathi vishvkosh