Thursday, February 5, 2015

क्रांतीवीर नाना पाटील(Krantiveer Nana Patil) एमपीएससी मुख्यपरीक्षा


क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.
क्रांतिसिंह नाना पाटील
Krantisinh-nana-patil.jpg
क्रांतिसिंह नाना पाटील
जन्म: ऑगस्ट ३, इ.स. १९००
बहेबोरगाव, पुणे सांगली, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: डिसेंबर ६, इ.स. १९७६ वाळवा येथे
वाळवा
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ
धर्म: हिंदू

जीवन

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.नाना पाटील याना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
क्रांतिसिंह नाना पाटील गाव सांगली जिल्ह्यातील येङमचछिद हे आहे.

स्वातंत्र्य लढा

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत.आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.मला वाळव्यामधेच दहन करन्यात यावे ही त्याची इछा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करन्यात आले.

स्वातंत्र्योत्तर काळ

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त ’दैनिक पुढारी’मधील चित्रमय जीवनवेध…
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.[१]

संबंधित साहित्य

  • क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
  • सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
  • क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
  • क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
  • पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
 स्त्रोत: मराठी विश्वकोश

Wednesday, February 4, 2015

अण्णा भाऊ साठे(annbhau sathe)एमपीएससी मुख्यपरीक्षा

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले [ संदर्भ हवा ]. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते.अण्णा भाऊ साठे म्हणजे विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर! शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.

जीवन

ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसर्‍या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत. लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.

क्रांतिकारक लेखक-कवी

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हेदेखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले. इ.स.१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्याय लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला.
अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित स.ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने व वा.वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबर्‍या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर अण्णा भाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्य

अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

अण्णा भाऊंच्या कादंबर्‍या

‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणार्‍या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणार्‍या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.

अण्णा भाऊंच्या कथा

अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले.
  • ‘उपकाराची फेड’ या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण पाहायला मिळते.
  • ‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे.
  • ‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात.
  • ‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे, मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोर्‍यामार्‍या करणार्‍या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे आणि त्यांचा जीवनसंघर्ष आढळतो.
  • ‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात
  • ‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे.
  • ‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे.
  • ‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.
  • ‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे.
  • ‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचे चित्रण आढळते.

अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी लिहिली गेलेली पुस्तके

  • अण्णा भाऊ साठे (चरित्र लेखक - बाबूराव गुरव)
  • अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख - एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)
  • माझा भाऊ अण्णा भाऊ (चरित्र - लेखक - शंकर साठे)
  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (चरित्र - डॉ. भगवान कौठेकर)
  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्‌मय (प्रकाशक -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
  • कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानने ’अण्णा भाऊ साठे साहित्य समीक्षा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्‍या ग्रंथात ’अण्णाभाऊंची वगनाट्ये’ हा लेख पान १०४-१११ या पानांवर आला आहे. ग्रंथाचे संपादक : प्रा. रणधीर शिंदे.
  • कपिल मीडिया प्रकाशनने ३० ऑगस्ट २०१०रोजी ’लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे गौरव अंक’ प्रकाशित केला होता. त्यात ’अण्णा भाऊंचा जाति‍अंताचा लढा’ हा लेख आला होता.

साहित्य संमेलने

  • अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक साहित्य संमेलने होतात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात. उदा० अण्णा भाऊ साहित्य संमेलन, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन किंवा साहित्यिक अण्णा भाऊ साहित्य संमेलन वगैरे वगैरे.

पुरस्कार

  • १९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.
 स्त्रोत:विकिपीडिया

विनायक दामोदर सावरकर (vinayak damodar savarkar) एमपीएससी मुख्यपरीक्षा

(२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरविनायक दामोदर सावरकरम्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.

८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले; तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद  ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी  ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण; सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे; रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे; इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे; शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.

मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.

ल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा  ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१)साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.

लंडनमध्ये असताना विहारी   आणि काळ  ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).

ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची  आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.

८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला; पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन  ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.

लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले सेनापती बापट  ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.

ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर  ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा   ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्‌स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा  ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.

सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली; त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).

सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला  हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल   ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.

९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी; मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप  (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.

स्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्‌गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.

सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते; दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.
सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.

सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.

अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला; तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.

दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली; तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

टना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी; तसे घडले.

भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.

त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते; तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व  ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.

सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले  (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला  हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता  (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप  ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी  (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने  (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात  (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने   ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात  हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे   ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी  (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप  (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स   आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय  (खंड १ ते ८, १९६३–६५) ह्यात समाविष्ट आहे.

मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्या अखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.

संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.
     २. कीर, धनंजय; अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.
     ३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे,  १९७०.
     ४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.
    ५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.
     ६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.

कुलकर्णी, अ. र.
 स्त्रोत: मराठी विश्वकोश


Monday, January 19, 2015

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?


पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे
एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर
उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड
आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स
ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर
बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन
सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त
गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.

###
सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस
करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके
घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात
सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल
आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह
मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर
तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न
करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
###
४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २
चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग
उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे
बेस्ट आहे ते शोधावे.
###
प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे
त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे
ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर
चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते
कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ
समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते
कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह
मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं
होईल.
###
पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग
सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून
बाकी आहेत सोडवायचे.
###
पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५
सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू
सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं
टेन्शन कमी होईल.

Saturday, January 17, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा :राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj

(२६ जून १८७४६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजछत्रपती राजर्षी शाहू महाराजसंस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.


त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.



कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.



वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.



शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.



हुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.



खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.



मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).



याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
स्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.



सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).



शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.



शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.



संदर्भ : 1. Keer, Dhananjay, Shahu Chhatrapati, A Royal Revloutionary, Bombay, 1976.

    2. Latthe, Annasaheb , Memoirs of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja, Kolhapur, १९२४.

   ३. नाईक, तु. बा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, पुणे, २००५. 

   ४. पवार, जयसिंगराव संपा., राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, कोल्हापूर, २००१. 

  ५. सूर्यवंशी, कृ. गो. राजर्षी शाहू : राजा व माणूस, पुणे, १९८४.

पवार, जयसिंगराव
source : marathi vishvkosh

Friday, January 16, 2015

MPSC राज्यसेवा पूर्वची तयारी कशी करावी ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी राज्य सरकारच्या सेवतील सुमारे २१ संवर्गातील प्रवर्ग-२, प्रवर्ग-१, तसेच पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक भरतीसाठी परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या स्पर्धापरीक्षेला दरवर्षी सुमारे तीन-चार लाख विद्यार्थी बसतात. यातील अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक तयारी करून परीक्षेला बसतात. परीक्षार्थींच्या मोठय़ा संख्येमुळे स्पर्धा ही अटीतटीची असते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीला जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकी यश मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण पदवी परीक्षेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांला असताना परीक्षेची तयारी सुरू केली तर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, काही कारणाने पदवीच्या प्रथम किंवा दुसऱ्या वर्षांला असताना तयारी करणे शक्य झाले नाही तर परीक्षेला बसण्याआधी किमान वर्षभर तरी या परीक्षांची तयारी करणे योग्य ठरते.
सर्वप्रथम राज्य पाठय़पुस्तक मंडळाची इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतची सर्व पुस्तके दोन ते तीन वेळा वाचावीत. मागच्या काही वर्षांत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास असे जाणवते की, साधारणत: २५ ते ३० टक्के प्रश्न हे या अभ्यासक्रमावर बेतलेले असतात.


  • राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी संदर्भ ग्रंथ

० चालू घडामोडी- या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज काही अग्रगण्य दैनिकांचे वाचन करून त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचे टिपण काढल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो.
० इतिहास- इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीला क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे.
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा. संदर्भपुस्तके: आधुनिक भारताचा इतिहास - बिपीनचंद्रा (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.) आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.)
० भूगोल - सर्वप्रथम इ. पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. संदर्भपुस्तके:  भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी, महाराष्ट्राचा समग्र भूगोल-
प्रा. ए. बी. सवदी
० पर्यावरण व परिस्थितिकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा वापरही करता येईल.
संदर्भपुस्तक: पर्यावरण व परिस्थितिकी - आपले पर्यावरण-  (प्रकाशक- नॅशनल बुक ट्रस्ट)
० भारतीय राज्यघटना - इ. अकरावी आणि बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत. संदर्भपुस्तके:  भारतीय राज्यघटना - एम. लक्ष्मीकांत (इंग्रजी).
आपली संसद - डॉ. सुभाष कश्यप (मराठीत भाषांतरित).
० आíथक व सामाजिक विकास- अकरावी-बारावीची क्रमिक पुस्तके. संदर्भपुस्तके: भारतीय अर्थव्यवस्था - प्रतियोगिता दर्पण (हे िहदीत तसेच इंग्रजीत उपलब्ध आहे. या पुस्तकातील अखेरीस नमूद केलेले प्रश्न अवश्य वाचावेत.) महाराष्ट्राची आíथक पाहणी.
० विज्ञान आणि तंत्रज्ञान- इ. सहावी ते इ. दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचावीत. संदर्भपुस्तके: स्पेक्ट्रम पब्लिकेशनची इंग्रजी पुस्तके. पुस्तकांव्यतिरिक्त योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकांमधील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत.


  • सी सॅट पेपर २ ची तयारी कशी करावी?

राज्यसेवेच्या परीक्षेत जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हापासून सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. हा पेपर २०० गुणांचा असून ८० प्रश्न दोन तासांत सोडवावे लागतात. गेल्या दोन वर्षांच्या निकालांचा अभ्यास केल्यास असे स्पष्ट होते की, ज्या विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये गती होती, त्यांना हा पेपर सोडवणे सोपे गेले. या पेपरची तयारी करताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गरसमज आहेत. उदा. सी सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर. या पेपरमध्ये गणित हा एक उपघटक आहे. गणितावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये गती नसेल त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, साधारणत: ८० प्रश्नांपकी ४० ते ५० प्रश्न आकलन या उपघटकावर होते, तसेच पाच प्रश्न निर्णयक्षमतेवर होते. म्हणजे थोडक्यात गणित या उपघटकाचा संबंध अत्यंत कमी येतो. या पेपरमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी अधिकाधिक सराव करणे आवश्यक ठरते. यात आकलन या महत्त्वाच्या उपघटकाचा अभ्यास करण्यासाठी वाचनवेग वाढवावा. अग्रगण्य दैनिकांतील संपादकीय लेखांचे वाचन करावे. वाचन झाल्यानंतर त्या लेखात विश्लेषणात्मक पद्धतीने मांडलेल्या मतांचा, विचारांचा अभ्यास करावा. असे केल्यास आपली आकलनक्षमता वाढते आणि याचा आपल्याला परीक्षेत उपयोग होतो. या पेपरमधील बुद्धिमत्तेविषयीच्या प्रश्नांची तयारी करताना सामान्य मानसिक क्षमता, आकृत्यांवरील प्रश्न, व्हेन आकृतीवरील प्रश्न, त्रिकोन, चौकोन मोजणे, दिशाबोध, नाते संबंधावरील प्रश्न, दिनदíशका, घडय़ाळ व वयासंबंधित प्रश्न, आरशातील प्रतिमा, जलप्रतिमा, घन व सोंगटय़ांवरील प्रश्न यांची तयारी करावी.

० जनरल मेन्टल एबिलिटी अ‍ॅण्ड बेसिक न्युमरसी (गणित)-
या घटकांतर्गत गणिताच्या काही संकल्पना येतात. उदा. काळ, काम, वेग यांवरील उदाहरणे, आगगाडीशी संबंधित उदाहरणे, बोटीशी संबंधित उदाहरणे, मांडणीसंदर्भात काही उदाहरणे, तसेच या घटकाचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासक्रमात नमूद केलेल्या डाटा इंटरप्रिटेशन या घटकाचीही तयारी होऊन जाते. या घटकाची तयारी करण्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतची राज्य पुस्तक मंडळाची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत. 'सिक्स्टी डेज वंडर इन मॅथ्स' या पुस्तकाचीही मदत होईल. मात्र या उपघटकाची तयारी करण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेबरोबरच पीएसआय व एसटीआयची तयारी करत असतील  त्यांनी या घटकाची तयारी नीट करावी.

इंग्रजीचे महत्त्व 
एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत इंग्रजीचा पेपर असतो. मात्र, त्याच्या गुणांचा विचार अंतिम यादीसाठी केला जात नाही. मात्र या प्रश्नपत्रिकेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या प्रश्नपत्रिकेत नापास झाल्यास इतर पेपर तपासले जात नाहीत. मात्र, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी १०० गुणांचा इंग्रजीचा पेपर अनिवार्य असतो. या पेपरचे गुण अंतिम यादीसाठी धरले जातात, म्हणून एमपीएससीच्या दृष्टीने या पेपरचे महत्त्व अधिक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने या पेपरची तयारी करावी. एखादे इंग्रजी नियतकालिक नियमितपणे वाचणे तसेच दररोज इंग्रजीत लिहिण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते.

अनिवार्य मराठीची तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत मराठी व इंग्रजीचे दोन पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे- १०० गुणांसाठी असतात. यातील गुण अंतिम यादीत धरले जातात, म्हणून चांगले गुण प्राप्त करून अंतिम यादीत निवड होण्यासाठी या पेपरच्या गुणांचे महत्त्व अधिक आहे. मराठी भाषा मातृभाषा असल्याने अनेक विद्यार्थी या पेपरला गृहीत धरतात; मात्र तयारी करताना सर्वप्रथम आयोगाच्या अभ्यासक्रमाचे बारकाईने अवलोकन करावे. आपले हस्ताक्षर सुवाच्च असावे. मराठीच्या पेपरमध्ये निबंधाचा महत्त्वाचा उपघटक आहे. या उपघटकाची तयारी  करताना वेळोवेळी निबंध लिहून ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. परीक्षेत विचारले जाणारे निबंध वैचारिक, कल्पनात्मक, आत्मकथनपर किंवा ज्वलंत प्रश्नांवर आधारित असतात. या सर्व घटकांवर लिहिण्याचा सराव करावा. निबंध या घटकाव्यतिरिक्त पत्रव्यवहार, वृत्तांतलेखन यांसारख्या उपघटकांवरदेखील लिहिण्याचा सराव करावा. भाषांतरावरही एक प्रश्न असतो. इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करायचे असते. यासाठी सर्वप्रथम तो उतारा समजून घेऊन त्याचा आशय लक्षात घेऊन नेमक्या शब्दांमध्ये त्याचे भाषांतर करणे आवश्यक असते. .

हे हि वाचा :